चित्रकथी

लहानपणी आपण सगळे स्टॅम्प, काडेपेट्यांचे छाप किंवा नाणी या पैकी काही ना काही साठवतोच. काही जण मोठेपणीही तो छंद चालू ठेवतात. पण आम्हाला मोठेपणी छंद लागला तो इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याचा. कधी आम्ही चित्रावरून गोष्ट शोधतो तर कधी गोष्टीवरून चित्र. याच सगळ्या समुद्रमंथनातून धांडोळा ( dhaandola.co.in ) हा आमचा ब्लॉग तयार झाला.

धांडोळ्यावर वेगवेगळ्या विषयांवर लिहूनही आमच्याकडं अनेक गोष्टी उरलेल्याच होत्या. कारण बरेचदा असं व्हायचं की विषय छान असायचा पण लेख लिहिण्याएवढी माहिती हाताशी नसायची किंवा लेखासाठी माहिती/चित्रं शोधताना इतरही अनेक गोष्टी हाती लागायच्या. असं होता होता आमच्याकडं अशा गोष्टींचाही भरपूर साठा तयार झाला. बातम्या, फोटो, चित्रं,पुस्तकं अशा अनेक गोष्टी आमच्या फोन, लॅपटॉपच्या मेमरीमध्ये भरभरून साठल्या. त्या चाळताना वाटून गेलं की हे नुसतं बघत रहायला पण केवढी मजा आहे.आणि मग त्यातून चित्रकथीचा जन्म झाला.

इथं एक नजर या पानावर आमच्या संग्रहातल्या जुन्या मजेशीर जाहिराती, जगाच्या पाठीवरमध्ये काही रंजक बातम्या, रुपेरी पडदा अर्थात फिल्मी चक्कर, स्मरणचित्रं या पानावर काही जुने फोटो, चित्रं किंवा अजून काहीतरी जे काळाच्या ओघात आपण विसरून गेलो आहोत अशा गोष्टी आणि पानं उलटताना या सदरात काही जुन्या पुस्तकातील चित्रं किंवा फोटो असं काहीही तुम्हाला सापडून जाईल. या संग्रहावर आमचा काहीही वैयक्तिक अधिकार नाही आम्ही ते फक्त शोधून तुमच्यापुढं सादर करतोय. इथं फक्त आम्हीच आमच्याकडच्या गोष्टी सादर करणार असंही नाही तर तुम्हीसुद्धा तुमचा संग्रह इथं स्वतःच्या नावाने सादर करू शकाल. इथल्या प्रत्येक पानावर तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण सापडेल हे निश्चित.

Design a site like this with WordPress.com
Get started